सरकारने कशावर लक्ष केंद्रित करावं? मंदिर की हॉस्पिटल?
या विषयावर माझी आजची पोस्ट.
गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल्स ची कमतरता असो की कोरोनाचे वाढते प्रमाण असो, काहीही कारण असले तरी खापर मात्र मंदिरांवर फोडले जात आहे.
सतत येणारे विनोदी मेम्स, आणि त्या मागची मानसिकता याचा काही ताळमेळ बसेना म्हणून आज यावर थोडं मत मांडत आहे.
काही गोष्टी आधीच स्पष्ट करूया त्या म्हणजे आपल्या देशांत मंदिराचा इतिहास हा फार प्राचीन आहे. अगदी मौर्य कालखंडात देखील विष्णू, शिव, पार्वती, गणपती इत्यादींची मंदिरं होती आणि पुरातत्व विभागात त्याचे पुरावे देखील आहेत.
फार फार तर पौराणिक काळात देखील सीता व तिच्या मैत्रिणी बाहेर देवीच्या मंदिरात जात आहेत असा प्रसंग आहे. म्हणजे तेव्हा देखील मंदिर हा प्रकार होता. पण ते जाऊ देऊ.
भौतिक दृष्ट्या अनेक संग्रहालयात आज देखील सातव्या/आठव्या शतकातील बुद्ध वा गणपतीच्या मुर्त्या अजूनही उपलब्ध आहेत.
हे सांगायचा उद्देश हा… की मंदिरं हा कोणत्याही सरकारचा प्रांत नाही.
ते तर पूर्वी राजे महाराजे बांधून घेत असत आणि नजीकच्या काळात भाविकच समुदाय करून एकत्र येऊन मंदिरं बांधू लागले.
लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशातून उभ्या राहणाऱ्या मंदिरांवर इतरांचा राग का आहे हे मला न उलगडणारं कोडं आहे.
लहान सहान मंदिरे सोडली तर अनेक मुख्य मंदिरांमध्ये अन्न प्रसाद असतो, तिथे गोरगरिबांना जेवण मोफत/अत्यल्प दरात मिळते. अनेक मंदिरे नियमितपणे सरकारकडे कर भरतात.
लोकोपयोगी कार्य करतात. संकटकाळी सरकारला मदत देखील करतात. आणि अनेक मंदिरांच्या जागेत हॉस्पिटल्स देखील उभे केले आहेत असे सध्याच्या संकट काळातली ताजी उदाहरणे आहेत.
अनेक मोठ्या मंदिराची ट्रस्ट आहेत, ज्या करवी गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत देखील उपलब्ध होते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई हे त्याचे उत्तम उदाहरण. तशी अनेक मंदिरे आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं तर मंदिर ही कोणत्याही शहरातली अतिशय निष्क्रिय अथवा निरुपयोगी जागा नक्कीच नाही. ज्यामुळे एवढा तांडव सुरु आहे.
कोणत्याही मंदिरातून तिथे अमुक एक वर्गणी दिल्यासच प्रवेश आहे अशी सक्ती नसते. मंदिर कुणाला आमंत्रण देखील करीत नाही. मंदिरावर केवळ तिथल्या पुजाऱ्याचे नाही तर फुल विक्रेता, नारळ वा तेल विक्रेता, सफाई कामगार अशा अनेकांचे पोट असते.
बरं तार्कीकदृष्ट्या हॉस्पिटल्स महत्वाचे आहेतच. ते अमान्य नाहीच. परंतू, केंद्र सरकारवर जी टीका होते, विशेष करून राम मंदिर निर्णयानंतर, की मंदिरापेक्षा हॉस्पिटल्स बांधले असते तर आज ही वेळ असली नसती ती तर फारच चुकीची वाटते.
एक तर, मोदी सरकार येऊन केवळ सहा वर्षे झाली आहेत. पण त्या पूर्वी तर स्वतःला सिक्युलर म्हणवणारे लोक होते खुर्चीवर.
तर त्यांनी एवढ्या काळात मंदिरे नाही बांधली ते उत्तम पण मग हॉस्पिटल्स का नाही बांधली? असा प्रश्न कुणीच का विचारत नाहीत?
राम मंदिराचा निर्णय हा पूर्णपणे भक्कम पुराव्यांच्या आधारावर न्यायलयाने दिला असल्याने, आणि त्यासाठी देखील देशभरातून प्रत्येक भाविकाने तसेच काही मंदिरांनी देणगी दिल्याने त्याचेही बांधकाम होईल ते लोकांच्या इच्छेने त्यांच्या निधीतूनच. आणि जे मंदिर बनेल ते कालजयी असेल यात तिळमात्र शंका नाही.
आपल्या देशात अत्यंत वैभवशाली अशी जी प्राचीन मंदिर होती, ती परकीय आक्रमणातून उध्वस्त झाली, मूर्त्या दागिने पळविले गेले तो काळा इतिहास काळाच्या पडद्याआड निघून जाऊन कसा चालेल?
ज्या मुघलांनी भारतातील ४०,००० मंदिरं तोडली, त्यांनी त्यावर त्यांच्या मशिदी उभ्या करण्याऐवजी हॉस्पिटल का नाही उभे केले असं एखाद्या सच्चा सिक्युलर व्यक्तीला का वाटत नाही?
४०,००० ऑन रेकॉर्ड आहेत, ऑफ रेकॉर्ड किती असतील याची गणतीच नाही.
असो.
तर प्रश्न केवळ हिंदू धर्मालाच विचारले जातात हा कोणता ‘सर्वधर्मसमभाव’?
गेल्या ३-४ महिन्यात ज्या शेतकरी आंदोलनात जनतेचा महासागर उसळला होता, तेव्हा कोरोना बद्दल कुणी काहीही बोलत नव्हतं, पण आता कुंभमेळ्यात हिंदू साधूंनी एकत्र येऊन स्नान केल्या बरोबर अचानक कोरोनाचे प्रमाण हे साधू वाढवणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
बरं जे फक्त विज्ञान मानतात, आणि काही अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाले(मला या कोरोना काळात कुठे दिसले नाहीत), ज्यांना मूर्ती पूजा चुकीची वाटते, लोकांची मूर्ख समजूत वाटते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की, प्रत्येक हॉस्पिटल मध्ये मात्र एक छोटसं मंदिर असतं. ते का बरं असावं?
जे स्वतः वैद्यकीय क्षेत्रांत पदवी घेणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या केबिन मध्ये, असा कसा तो देवांचा वैद्य धन्वंतरी बसवलेला असतो?
विज्ञानाचा आणि या भंपक कल्पनेचा काय संबंध? मग हे डॉक्टर्स सुद्धा अंधश्रद्धाळू म्हणायचे का?
आणि परदेशात तर अद्ययावत सुविधेची हॉस्पिटल्स आहेतच, तिथे तर मंदिरे नाहीत, तरी देखील तिथे कोरोना कसा वाढला? एवढे मृत्यू कसे झाले? हा देखील विषय चिंतनीय नाही का?
बरं, नुकतंच पाश्चात्य देशात काही वैज्ञानिकांनी एक शोध लावला आहे की प्रत्येक गोष्ट अतिसूक्ष्म कणांपासून बनली असते, त्यात इलेक्ट्रोन, न्युट्रॉन सोबत एक अदृश्य कण असतो, म्हणजे तो गॉड पार्टिकल असतो म्हणे.
अच्छा, म्हणजे जे अनेक युगानुयुगे आपल्या भारतात आपली श्रद्धा आहे की कणाकणात ईश्वर आहे, ते यांना आता एकविसाव्या शतकात कळत आहे.
असो काही हरकत नाही. मुद्दा मंदिरांचा आहे.
तर , काही मंदिरात काळा बाजार होतो, त्याचे समर्थन मी नक्कीच करू इच्छित नाही. पण जिथे पाऊल ठेवल्या ठेवल्या मन आशेने भरून जातं, ती अत्युच्च सकारात्मक उर्जेची जागा म्हणजे मंदिर आहे, असं मला वाटतं.
मंदिर की हॉस्पिटल?
या पोस्टच्या मागील माझा उद्देश केवळ एकच आहे आणि तो म्हणजे मंदिर बांधणीबद्दल लोकांच्या मनात घृणा उत्पन्न केली जात आहे ती थोड्या प्रमाणात खोडून काढणे.
हॉस्पिटल ही देखील पवित्र वास्तू आहे, पण तिचे मानवी जीवनातील स्थान वेगळे आहे.
त्यामुळे, हॉस्पिटल्स आणि मंदिरं यांची तुलना करणारे मेसेजेस हे केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्याचे एक नवे परिमाण आहे, हे लक्षात येते. कारण असले सल्ले इतर कोणालाही दिले जात नाहीत.
त्यामुळे या दोन्ही गोष्टी संपूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यांची तुलना होऊ शकत नाही हेच सत्य आहे. उठ सूट आपलं हिंदू , त्यांच्या देवता आणि आता मंदिरं …. केवढा हिंदू द्वेष पसरवणार हिंदूंच्याच मनांत ?
सरकारनी हॉस्पिटल्स बांधावीत. जरूर बांधावीत.
मी तर म्हणते, सिक्युलरिजम जर खरोखर सर्व धर्मीय लोक मानत असतील, आणि सध्याच्या संकट काळात हॉस्पिटल ची एवढी कमतरता असेल, तर सरकारने राम मंदिर बांधकाम थांबवावं आणि तो ताजमहाल देखील विकून अथवा पाडून टाकावा, आणि त्यातील पैशातून त्या जागांवर भव्य हॉस्पिटल्स आग्रा आणि अयोध्येत बांधावे. एकदाचे सर्वधर्मसमभाव दाखवूनच देऊ जगाला.
जय हिंद !!!
Very well said Kimaya….👍
Thanks 🙂🙏