आज २३एप्रिल, जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन व मृत्यूदिन आणि जागतिक पुस्तक दिन देखील.
आजची तरुण पिढी वाचत नाही, वाचन संस्कृती कमी झाली आहे, पुस्तकं वाचकांविना झाली पोरकी या सर्व निबंधक विषयांवर लिहिण्यापेक्षा मी या पोस्ट मार्फत काही अतिशय वाचनीय आणि स्मरणीय पुस्तकं सुचवण्याचा प्रयत्न करते आहे.
मराठी व इंग्रजी भाषेतील मला आवडलेली पुस्तकं या यादीत देत आहे.
व्यक्ती चित्रण :
आपल्याला आयुष्यात कितीतरी माणसं भेटतात. काहींशी जन्मताच नातं जुळतं. काही मैत्रीने आयुष्यात येतात. काहींशी अचानक भेट होते आणि जन्मजन्माचे ऋणानुबंध जुळून येतात. काहींची भेट होणं आणि त्यांचं आपल्या आयुष्यात येणंच विधिलिखित असतं.
आणि अशा विविध मुखवट्याच्या आपल्या आयुष्यातील व्यक्तिरेखा, कधी वैशाखी चटके देणाऱ्या तर कधी वळवाची सर असल्या सारख्या तप्त उन्हात मनाला शांत करणाऱ्या असतात.
या माणसांशी बऱ्याचदा आपलं रक्ताचं नातं नसतं. मग नक्की कोणत्या धाग्याने आपण जोडले गेले असतो?
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटलेल्या विविध व्यक्तींचं अगदी बोलकं चित्रण केलेली मराठीतील दोन पुस्तकं म्हणजे,
‘व्यक्ती आणि वल्ली‘ – पु.लं. देशपांडे आणि ‘अशी मने असे नमुने‘ – शिवाजी सावंत.
या पुस्तकांत उभ्या केलेल्या सर्वच व्यक्तीरेखांमध्ये एक निष्पाप खरेपणा आहे. उगाच पुस्तकात शोभाव्यात म्हणून अलंकारिक शब्दांनी त्यांना सजवलेले नाही, की नाट्यमय संवादांनी त्यांना कृत्रिम केलेले नाही. अतिशय सरळ, साधे आणि म्हणूनच अगदी आपल्याच मधल्या वाटणाऱ्या या सर्व व्यक्तींबद्दल वाचणे म्हणजे एक वेगळीच मजा आहे.
पु.लं. चे अंतू बर्वा, नारायण, पेस्तनकाका आणि शिवाजी सावंत यांचे खडकावरची म्हातारी, तोतरा दत्तू हे मला विशेष आवडलेले लेखन.
व्यक्तीचित्रण वाचायला आवडत असेल तर ही दोन पुस्तकं जरूर वाचा.
‘प्रकाशवाटा’ – डॉ. प्रकाश आमटे आणि ‘नेगल’ : श्री. विलास मनोहर
१९७३ साली हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जगच त्यांना मुळी माहीत नव्हतं.
‘या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी’, असं बाबा आमटेंच्या मनात होतं. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या काही साथीदारांनी लोकबिरादरी प्रकल्पाची जवाबदारी पूर्णपणे स्वीकारली.
आज तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील देखील होत आहेत. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे.
या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, विलास मनोहर, जगन मचकले, दादा पांचाळ, गोपाळ फडणीस, रेणुका मनोहर आणि आता दिगंत, अनघा व अनिकेत या सार्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा‘ हे डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र.
त्यामुळे, आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करणारे, वन्य जीवांना आसरा देणारे, मगसेसे पुरस्कराने सन्मानित अशा डॉ. प्रकाश आमटेंचे ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक कायम संग्रही ठेवावे असेच आहे.
त्याच बरोबर मनाला थेट भिडणारे दुसरे पुस्तक म्हणजे डॉ.प्रकाश आमटे यांचे सहकारी श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेले ‘नेगल’
त्यावेळी, गडचिरोली जिल्ह्यातील त्या खोल व घनदाट जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व त्यांचे साथीदार विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून अनेक वन्यप्राण्यांचा १९७५ पासून प्रेमाने सांभाळ केला, अजूनही करताहेत. ह्यापैकी कुठलेही प्राणी त्यांनी जंगलात जाऊन आणलेले नाहीत.
डॉ. आमटे आदिवासींना मदत करण्यासाठी, त्यांच्यासाठी दवाखाना, शिक्षण आणि शेतकाम देण्यासाठी हेमलकासामध्ये गेले, तेव्हा त्यांना समजलं कि हे आदिवासी खाण्यासाठी प्राण्यांची शिकार करतात.
शिकारीमध्ये मारलेल्या मोठ्या प्राण्यांच्या पिल्लांचा आमटेंनी सांभाळ करायला सुरुवात केली. आणि मग पुढे आदिवासी स्वतःहून वन्यप्राण्यांची पिल्ले प्रकल्पावर देऊ लागली आणि प्राण्यांची संख्या वाढत गेली.
तिथे सांभाळायला असलेल्या अस्वल, माकड, ह्याबाबतीतले बरेच किस्से विलास मनोहर ह्यांनी सुंदर पद्धतीने ‘नेगल’ ह्या पुस्तकात मांडले आहेत.
हे सगळे अनुभव अतिशय विलक्षण आहेत. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वच मंडळींनी तर हे पुस्तक जरूर वाचावे.
ह्या पुस्तकातील काही अनुभव वाचतांना आपल्या चेहऱ्यावर नकळत हास्याची लकेर उमटते , तर काही मंत्रमुग्ध करून सोडतात. नेगली (बिबट्या) तिच्या पिल्लांना दाताने उचलून आमटे आणि विलास मनोहरांना दाखवायला घेऊन येते हा प्रसंग तर इतका भावुक आहे कि डोळ्यातून पाणी येते. आणि खरोखर प्राण्यांना सुद्धा अगदी आपल्या सारख्याच भावना असतात हे स्पष्टपणे जाणवते.
वाघ, सिंह, तरस सारख्या समाजाने हिंस्र ठरवलेल्या प्राण्यांची पिल्लं सुद्धा आमटेंच्या हातून मऊ दूध-भात खात आहेत हे वाचतांना थक्क व्हायला होते . राणी अस्वलाबरोबरची मस्ती, बबली माकडिणीचा मिश्कीलपणा, नाग-उंदराचे, हरीण, मोर आणि अश्या अनेक प्राणी-पक्ष्यांचे किस्से वाचताना आपण अक्षरशः हरवून जातो. आणि सरळ उठून हेमलकस्याला जाऊन ह्या प्राण्यांच्या सहवासात वेळ घालवावा अशी इच्छा होते.
‘लॉस्ट इन द जंगल ’ – योसी घीन्सबर्ग
माणसावर मृत्यूच्या छायेत वावरायची वेळ आली तर तो काय करेल?
जगणं अवघड आणि मृत्यू सुटकादायक आहे अशी वेळ आली तर माणूस कसा वागेल?
आणि अशा संकट काळात मृत्यूला शरण न जाता शेवटच्या क्षणापर्यंत तग धरून राहण्याचा चिवटपणा माणसात कुठून येतो?
अशी काही यमराजाच्या दारापर्यंत जाऊन पुन्हा परत आलेली माणसं मुळातच असामान्य असतात की परिस्थिती त्यांना तसं बनवते?
आपल्यावर असा जीवन-मरणाचा प्रसंग आलाच तर जीव वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि त्यात किती सफल होऊ शकतो?
‘‘लॉस्ट इन द जंगल ’, हे योसी घीन्सबर्ग यांनी लिहिलेले पुस्तक अशाच चित्त थरारक अनुभवांनी भरलेले आहे. अंतर्मुख करणारे आहे.
ही कथा आहे १९८१ मध्ये घडलेली. योसी घीन्सबर्ग म्हणजे इस्राईलचा एक साहसी भटका तरुण. साहसाच्या ओढीने काही मित्रांसोबत तो अमेझॉन च्या जंगलात जातो. आणि पुढे अपघाताने त्यांचे मार्ग वेगळे होतात व तो एकटाच जंगलात भरकटतो. एक-दोन नाही तर चक्क २१ दिवस!
आणि अमेझॉन चं जंगल म्हणजे गंमत नाही. हे जगातलं सर्वात मोठं अजस्त्र पर्जन्यवन. याचा विस्तार अफाट आहे, मैलोन्मैल माणसांचा मागमूसही नसलेलं हे जंगल कितीतरी भयानक प्राणी आणि कीटकांचं, विषारी वेली वनस्पतीचं वसतीस्थान आहे.
कितीतरी काळ कोसळणाऱ्या पावसामुळे जमिनीवर साचलेला पालापाचोळ्याचा थर, पुरामुळे पाण्यात गाडल्या गेलेली झाडं, वरून जमीन असं भासवणारी आणि आत खेचणारी भयावह दलदल, आणि थोडक्यात सांगायचं तर सामान्य माणसाला जगायला अतिशय प्रतिकूल असं हे जंगल, केवळ कुतूहलापोटी माणसांना स्वतः कडे ओढून घेतं.
योसीच्या मनात हेच जंगल अगदी आरपार बघावं, जंगलात भटकावं अशी सुप्त इच्छा होती.असाच विचार करणारे अजून ३ साहसी मित्र त्याला भेटतात आणि यांच्या मनातील साहसाच्या इच्छेला धुमारे फुटतात.
महिनाभर फिरून आपापल्या घरी परत जायचं असं ठरवून, फिरण्याचे अत्यावश्यक साहित्य आणि गरजेच्या वस्तू घेऊन ही चौकडी जंगलात फिरायला निघते.
प्रत्यक्ष जंगलाचे अनुभव यायला लागल्या नंतर मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हा गूढ प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अमेझॉन च्या अजस्त्र रुपाची आपण येण्यापूर्वी कल्पनाच करू शकलो नाही.
आणि कल्पनेतल्या सह्सापेक्षा अमेझॉन हे काहीच्या काही पलीकडचं प्रकरण आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागतं. परंतू पुढे जायची उत्सुकता आणि चित्तथरारक अनुभव यांनी त्यांचा प्रवास सुरूच राहतो.
एका वळणावर मात्र योसी एकटा पडतो. तिथून पुढे त्याने केलेला प्रवास, त्या प्रवासात आलेल्या भयंकर अडचणी आणि अग्निपरीक्षेतून बाहेर आल्यानंतर त्या प्रवासातील अनुभव त्याने पुस्तकात लिहिला आहे.
मुळात आपली आकलनशक्ती जिथे संपते तिथूनच पुढे योसीचा प्रवास सुरु होतो. ते प्रेरणादायी देखील आहे. आपणही योसी सोबत चालत राहतो. मृत्यू पाहिलेला माणूस ,मृत्यूच्या हातात हात घालून चालणारा माणूस जेव्हा मृत्यूला हरवून परत येतो ते वाचतांना आपल्या नकळत आपण देखील मनाने प्रबळ बनत जातो.
त्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म देखील डिस्कवरी वर उपलब्ध आहे आणि योसी च्या अनुभवावर आधारित ‘जंगल’ नावाचा सिनेमाही २०१७ मध्ये प्रदर्शित झाला आहे.
खरंतर, अंथरुणाला खिळून असलेला माणूस जेव्हा मृत्यूशी झुंज देत असतो तेव्हा त्याच्या जवळ त्याला जगवण्यासाठी धडपड करणारी इतर माणसं किंवा साधनं असतात.
परंतू निर्जन जंगलात एकट्या पडलेल्या योसी ची मृत्युसोबतची लढाई केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच तो जिंकू शकला, हे सर्व वाचतांना मन ढवळून निघतं.
असो, आजच्या दिवशी एवढेच. या पूर्वी देखील काही पुस्तकांची यादी मी दिली होती त्याची लिंक देत आहे.
जागतिक पुस्तक दिन हे निमित्त आहे,वेगवेगळ्या पुस्तकांची चर्चा करण्याचे. तुमच्याही आवडीच्या पुस्तकांची नावे कमेंट मध्ये जरूर कळवा.
घरी राहा, वाचत राहा !
Khup chan vishleshan👌👌👍
खूपच छान लिहिले आहे👍👍
धन्यवाद🙂
अप्रतिम! यातील काही पुस्तके वाचली आहेत पण आता बाकीही नक्की वाचेन!
👍😊
Excellent
Thanks 🙂