तुम्ही कधी मुक्या माणसांचा आवाज ऐकलाय?
काहीही न बोलता सुद्धा फार काही बोलता येतं हे कधी अनुभवलंय?
अनेक शब्दांना लाजवील अशी मूक भाषा काल मी पाहीली, ऐकली…समजली सुद्धा !
सध्या जिकडे पहावं तिकडे प्रेमी युगुलांची वीट येईल एवढी मस्ती सुरु असते. पण मग हे लहान मुलांच्या गार्डनमध्ये जे अतिक्रमण करतात त्याने अगदी नकोसं होतं.
बरं, पोरांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे मग त्या समाधीस्त दोघांपेक्षा आपणच कॉन्शियस राहतो, की आपल्या पोरांमुळे त्यांचा तपोभंग होऊ नये.
अश्या या आताच्या अति आधुनिक किंवा पाश्चिमात्य किंबहुना फिल्मी प्रियकर प्रेयसींच्या लाडिक लाडिक वावरात एका प्रियकराने त्याच्या प्रेयसी साठी तब्बल ९८ गुलाब दिले… का तर म्हणे ते तिचं जन्म वर्ष होतं..तिने तत्काळ होकार कळवला असणार कारण आजच्या तारखेला फक्त एक गुलाब साधारण १० रुपयाला मिळतो.. म्हणजे ९८ गुलाबांचे झाले ९८० रुपये .. तर फक्त प्रपोजला जो एवढे पैसे खर्च करतोय तो पुढे चांगलेच उधळेल हे तिला नक्कीच माहित असणार. नाही का?
तर असे अनेक गमतीशीर प्रपोजल्स मी पहिले आहेत किंबहुना आजकाल असंच असतं असं मला वाटत होतं.
पण पैशाची उधळण आणि फॅशनचा भपका असलेल्या अनेक प्रपोज्ल्सला लाजवील असं एक तरल आणि सुंदर प्रपोजल मी काल बघितलं.
काल दोन्ही पोरांना घेऊन गार्डनमध्ये गेलेले. काही वेळाने अगदी समोरच्या बाकावर एक तरुण मुलगा आणि एक मुलगी येऊन बसले. साधारण कॉलेजला जाणारी. आता समोर काही अनुचित प्रकार घडेल की काय याची चिंता वाटून मी उठणार होते. पण दोघे अगदी खानदानी अभ्यासू होते.
काही बोलायच्या आधी दोघांनी bag मधून वह्या पुस्तकं काढली. काही क्षणातच दोघे खुणेने एकमेकांशी बोलू लागले. मला अंदाज आला की दोघेही मूक बधीर होते.
त्यांची ती हातवाऱ्यांची भाषा व ती धडपड बघून मनात कालवाकालव झाली.
कसं होत असेल यांचं या जगात ? कसं सांगत असतील ते इतरांना आपल्या मनातलं? वाचाच हिरावून घेतली परमेश्वराने तर मग मनातलं शब्दांत मांडायचं तरी कसं त्यांनी? असे अनेक प्रश्न मला पडले. आणि काहीशी करुणा वाटली त्यांच्याविषयी..
काही वेळ असाच विचारात गेला. तेवढ्यात त्या मुलाने त्याच्या बागेतून एक भलं मोठं चॉकलेट काढलं.
तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न उभे राहिले. तिने खुणेनेच त्याला विचारलं.
तोही खुणेने फक्त ‘ठेव’ एवढंच म्हणाला.
तिने ते घेतलं आणि फक्त हसली.
मग त्याने त्याचं पुस्तक बंद केलं.
कपाळावर अनेक प्रश्नचिन्ह दाटून आले.
मग तिने खुणेनेच त्याने दिलेलं चॉकलेट उघडू का असं विचारलं.
‘नाही..ते फक्त तुझ्यासाठी आहे..’ त्याचा निश्चयी इशारा .. .
मला फार गोड वाटलं, एव्हाना त्याच्या डोळ्यात दाटून आलेले भाव मला पूर्णपणे समजलेले.
खरोखर, माझ्या समोर बसलेल्या त्या मुक्या प्रियकराला, आपल्या प्रेयसीला आपल्या मनातलं गुपित सांगण्यासाठी कोणत्याही शब्दांची गरज भासू नये इतका उत्कट प्रेमभाव त्याच्या डोळ्यात दाटला होता.
हातवारे करतच तो तिच्याशी बोलत होता…
आता त्याने बॅगेतून अजून काहीतरी काढलं आणि तिला दिलं, ते एक लहानसं किचेन होतं ज्यावर तिचं नाव कोरलं होतं बहुदा. मला लांबून फारसं दिसलं नाही पण ती खूष झालेली एवढं समजलं.
तिने आनंदाने लगेच तिच्या पर्सच्या चेनला लावलं.
ते लावतांना पण त्याची तिला ते लावून देण्यासाठी धडपड सुरु होती.
मी त्या दोघांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत होते..
दोघं पुन्हा खुणेने एकमेकांशी बोलू लागले.
आता त्याचा धीर चेपला होता.
अगदी साधेपणाने आता त्याने एकदम लाल भडक गुलाब तिच्यासमोर धरलं.
तिच्या डोळ्यात बघत खुणेनेच तिला “माझी होशील का ?” विचारलं…
आता वेळ तिची होती..
‘शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ’ या पाडगावकरांच्या ओळी किती खऱ्या आहेत हे मी समोर प्रत्यक्ष बघत अनुभवत होते.
तिने त्याच्या मनातलं सारं काही जाणलं होतं…
अचानक समोर आलेलं हे सुखद स्वप्न पाहून ती हरखून गेली होती. पण होकार द्यावा तरी कसा, असा ती विचार करत असावी..कारण अजूनही ते फुल त्याच्याच हातात होतं…
ती विचारात गढून गेली असतांना त्याने कळकळीने खुण केली..
ती कदाचित ‘तुझ्याशिवाय मला दुसरं कोण समजून घेणार? ’ अशी असावी…
त्याचं ते मूक आर्जव मोठं काम करून गेलं. तिने लाजून डोळ्यानेच हो म्हटलं…
पण तिला अचानक चारचौघात असं गुलाब वगरे घ्यायला लाज वाटत असावी.
ती खुणेने त्याला “ते परत ठेऊन दे” सांगू लागली, सगळ्या जगाच्या विखारी नजरा माझ्या कडे बघतायत असं इकडे तिकडे त्याला दाखवू लागली.
(त्यात एक नजर माझी पण होतीच.).
मग त्याने पण धिटाईने माझ्यासकट आजूबाजूला सगळ्याकडे बोट फिरवत .
‘भाडमे जाये लोग ’ असा इशारा करून पुन्हा ते टपोरं गुलाब तिच्यापुढे केलं.
आणि मग तिने ‘काय तू पण..एवढे दिवस लावले सांगायला ’ असं त्याच्यावरच डाव पालटत त्या गुलाबाचा स्वीकार केला.
दोघांच्या मनातलं प्रेम त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने फक्त डोळ्यांनी साजरं झालं.
मला अक्षरशः त्या क्षणी उभं राहून टाळ्या वाजवाव्या असं वाटत होतं, माझ्या नकळत माझे डोळे किंचित ओले झाले होते..
त्या दोघांमध्ये मूकपणे हातवारे करत जो काही संवाद सुरु होता तो इतका सुंदर आणि बोलका होता, की आपल्या सारख्या बोलक्यांनी मुकं व्हावं.
वाटलं, खरंय, जशी तुम्हा आम्हा सारख्यांची शब्दांची भाषा असते, तशीच आणि त्याहूनही बोलकी शब्दांपलीकडची पण एक भाषा असते.
बोलता-ऐकता न येणं म्हणजे एक शाप आहे, हे आपल्यासारख्या बोलक्यांनाच वाटतं, कारण आपल्याला शब्दांचा भलताच सोस असतो जन्मापासून!
पण तोंडाने बोलता येत नसलं तरी त्यांचं अखंड शरीर बोलतं, डोळ्यांनी, हातांनी, मुद्रेनी ..आणि कदाचित शब्दांच्या मुकेपणाची कसलीही तमा न बाळगता भाव प्रकट करता येतो त्यांना ,आपल्या अंगप्रत्यंगातून उस्फुर्तपणे व्यक्त होता येण्याची शक्ती निसर्गाने त्यांना दिली असते हे तो चैतन्यमय प्रेमाचा सोहळा बघून मला जाणवलं.
प्रेम असेल तर नजरेची भाषा समोरच्याला नक्कीच कळते.
म्हणून सांगते शब्दांच्या पलीकडले भाव समजून घ्यायचे असतील तर प्रेमात पडा… 🙂
– किमया.
वा मस्तच… चित्र खरच डोळ्यासमोर उभं राहिलं… मस्तच 👌👍
धन्यवाद 😊
त्या गाण्याची आठवण झाली…..कुछ ना कहो …..कुछ भी ना कहो ….काही प्रसंगाचे आपण नकळत साक्षीदार होतो….संबंध नसताना, कारण नसताना…आणि आपल्यालाच खूप गुंतायला होत त्यात…अस काहीस…खूप सुंदरस….
अगदी खरं 💕
वाचताना संपूर्ण घटना डोळ्यासमोर घडत आहे असं वाटलं… अप्रतिम 👌
धन्यवाद 🙏💕
मस्तच आहे ह्याचे वर्णन खरच शब्दांच्या पलीकडे आहे ..
Thanks 💕
फार सुरेख! आजकाल असे प्रपोजल viralach…शब्दांच्या पलिकडले!
धन्यवाद😊