स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर !
कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास हा (माझ्याकरिता कंटाळवाणा ) विषय देखील मनापासून आवडू लागला.
आणि एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच त्यांचे एक इतिहासकर म्हणून आपल्या मराठी साहित्य क्षेत्रांत देखील योगदान आहे.
अगदी लहापणापासून त्यांना अज्ञात इतिहास जाणून घेण्याची ओढ होती. इथे त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग सांगावासा वाटतो.
‘अ शॉर्ट हिस्टरी ऑफ द वर्ल्ड ‘ या पुस्तकातील ‘अरबांचा इतिहास ’ हा भाग त्यांना घरात मिळाला. पण त्याचं पहिलं पान मात्र हरवलं होतं. घरभर ते पान शोधूनही काही सापडेना. त्या पहिल्या पानावर इतिहासातील नक्की कोणत्या घटनेचा उल्लेख असेल या विचाराने ते अस्वस्थ झाले.
आणि त्यांच्या लहान वयात देखील, त्या अज्ञात इतिहासाला समर्पित असं एक काव्य त्यांनी लिहिलं,
जे भौमिक त्यांचा न शक्य सकलांचा
विश्वेतिहास लिप्से तुजसी वेध अकाट्य विकलांचा
कल्प विमानीही की,तू ताऱ्यांचे जिने करुनी नभी
जाशील उंच शोधीत शोधीत कितीही जरी धरुनी नभी
इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहायाते
आरंभ तुझा दुसऱ्या पानापासुनी शाप हा त्याते |
बापरे ! म्हणजे इतिहासाचं पहिलं पान वाचायला न मिळणे हा एक शाप आहे असा विचार एका लहानग्या मुलाच्या मनात येतो, तो इतिहासप्रेमी किंवा इतिहासकार नाही तर मग कोण?
पुढे महाविद्यालयीन जीवनांत त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत गेले. इतिहासावर प्रेम, आणि लेखणीचे सामर्थ्य यावर त्यांनी तानाजीचा पोवाडा, शिवरायांची आरती, चाफेकरांचा फटका अश्या अनेक काव्यरचना केल्या.
परंतू केवळ काव्यरचना करणे म्हणजे इतिहास लेखन नाही. त्यामुळे पुढे अगदी अभ्यासपूर्ण रीतीने त्यांनी ‘हिंदू पद-पादशाही ’, ‘सहा सोनेरी पाने‘, ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर‘ ‘जोसेफ मॅझिनी चे चरित्र ‘ अशी अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहिली. त्यामुळे मराठी साहित्यसंपदा देखील समृद्ध झाली.
त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा अभ्यास केला. विविध संदर्भ ग्रंथ, प्रवासवर्णने, देशोदेशीचे पत्र व्यवहार इत्यादी. खरंतर अंदमानचा दीर्घकालीन तुरुंगवास त्यांच्या आयुष्यात नसता, तर त्यांच्याकडून अजून अनेक ऐतिहासिक लेखनाचं योगदान लाभलं असतं.
त्यांनी लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर ’ आणि ‘सहा सोनेरी पाने’ या दोन पुस्तकांबद्दल आज थोडं लिहावसं वाटलं आणि ‘इतिहासकार सावरकर ही त्यांची भूमिका मला का प्रिय आहे ते सांगण्यासाठी आजची ही पोस्ट.
१८५७ चे स्वातंत्र्य समर :
या पुस्तकाचे एक विशेष हे आहे की या पुस्तकामागे देखील फार मोठा इतिहास आहे.
अगदी तरुण वयात सावरकरांना १८५७ च्या उठावाबद्द्ल अनेक प्रश्न पडले होते. ब्रिटीशांविरुद्ध अनेक भारतीय एकत्र कसे आले? त्याची सुरुवात कशी झाली असावी? बरं, जो उठाव झाला, त्याचे पुन्हा पुढे मोठे रुपांतर होऊ नये म्हणून ब्रिटीश त्या उठावाचा उल्लेख ‘शिपायाचे बंड ’ असा करत.
परंतू, अभ्यासाअंती सावरकरांच्या हे लक्षात आले की १८५७ चे युद्ध हे काही साधेसुधे बंड नव्हते. आणि म्हणूनच ती सगळी नावं झुगारून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर ’ हे नाव दिले.
हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी ब्रिटीश ग्रंथालय अक्षरशः पालथे घातले, अनेक संदर्भ मिळवले. त्यांचं असं सततचं ग्रंथालयात येणं जाणं आणि ठराविक संदर्भ मिळवणं यामुळे ग्रंथपालांना शंका आली. आणि इधे संदर्भ शोधण्यामागचा हेतू लक्षात आल्यावर त्यांनी सावरकरांना ग्रंथालयात येण्यास बंदी केली. परंतू तोवर मराठीतील त्यांच बरंच लेखन पूर्ण झालं होतं. इकडे छापणं शक्य नसल्याने हॉलंड जर्मनी मध्ये हे पुस्तक छापले गेले.
हे इतिहासतील एकमेव उदाहरण आहे ज्यात या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच बंदी आणली गेली. याचं कारण सरकारला विचारता त्यांच्याकडे याचं नीट उत्तर देखील नव्हतं. परंतू, बंदी घालण्यासाठी पुस्तकाचं शीर्षकच पुरेसं होतं.नाही का?
या पुस्तकाचे वितरण देखील अतिशय गुप्तपणे भारतात झाले. विदेशातून आलेल्या मालाच्या पेट्यांमध्ये वेगळ्या पुस्तकांच्या मुखपृष्ठात लपवून ते भारतात विविध राज्यात वाटलं गेल. अनेक क्रांतिकारकांसाठी हे पुस्तक म्हणजे स्फुर्तीगीता ठरलं. अनेक भाषांमध्ये त्याच भाषांतर केल्या गेलं.
उघडपणे बंदी असल्याने, मूळ मराठीतील (सावरकरांनी हाताने लिहिलेली) प्रत , जवळजवळ ४० वर्षे डॉ.कुटिन्हो यांनी अमेरिकेत सांभाळून ठेवली. आणि स्वातंत्र्यानंतर ती मूळ प्रत १९४९ मध्ये सावरकरांना पाठवली. आणि तेव्हा त्याचे प्रकाशन झाले. ही खरोखर जगातील एकमेव घटना आहे.
१८५७ मध्ये शहीद झालेल्या अनेक हुतात्म्यांना समर्पित असं हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.
सहा सोनेरी पाने :
आता इतिहासकार म्हणजे लेखनात तटस्थपणा हवा. तो त्यांनी कसोशीने पाळला. अगदी जाज्वल्य हिंदुवादी असले तरीही.
तत्कालीन परिस्थितीत इंग्रजी शाळांमधून तयार झालेल्या ब्रिटीश धार्जिण्या कारकुनांनी लिहिलेला इतिहास सावरकरांना मुळीच मान्य नव्हता. ‘भारताचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास ’ ही विचारसरणी पुढील पिढीसाठी भारताविषयी वाटणाऱ्या प्रेमाबाबत घातकच होती. ती त्यांनी स्वतःच्या लेखणीतून खोडून काढली.
भारतभूमीचा इतिहास हा जर पराभूतांचा इतिहास असता तर ही संस्कृती आतापर्यंत कधीच नामशेष झाली असती. पण तसे दिसत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचा नेहमी गौरवास्पद भाषेतच उल्लेख करायला हवा.
सावरकरांनी हिंदुनिष्ठ भावनेतून इतिहास लिहिला परंतू तो खरा, आणि अभ्यासपूर्ण लिहिला. इतिहास लेखन म्हणजे व्यक्तीपूजन नाही हे त्यांना माहीत होतं.
भावनेच्या आहारी न जाता, इतिहासातून बोध घेऊन आपल्या पूर्वजांकडून झालेय चुका पुन्हा होऊ नये म्हणून दोन्ही बाजू मांडल्या. वेद -पुराणातील दाखले देऊन आता कोणता भाग कालबाह्य आहे हे सुद्धा लिहिले.
‘सहा सोनेरी पाने’ हे सावरकरांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक.
आता सहा सोनेरी पानं कोणती? तर भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पानं. हे पुस्तक लिहिण्यामागे त्यांचा काय हेतू होता?
आधी सांगितल्याप्रमाणे, इंग्रजांच्या सत्तेखाली त्यांनी ज्या काही शाळा महाविद्यालये सुरु केली, त्यातून त्यांनी भारताचा इतिहास जाणीवपूर्वक विकृतपणे लिहिला.
आणि आपल्या जवळजवळ २-३ पिढ्यांकडून त्याची अशी काही पारायणे घडवली की, इतर देश सोडाच, पण आपल्या लोकांचा देखील बुद्धिभ्रंश व्हावा.
भारत राष्ट्र हे कायम पारतंत्र्याखाली दडपलेले होते किंवा ‘हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे हिंदूंच्या पराभवाची काय ती एक जंत्री आहे’ अशी खोटी आणि अतिशय दुष्ट हेतूने केलेली विधाने त्या काळात फक्त परकीय काय अगदी स्वकियांकडून देखील वापरली जात होती.
आणि हे ऐकून, एक राष्ट्र्पेमी , ज्याकडे लेखणीचे सामर्थ्य आहे आणि इतिहासावर देखील प्रेम आहे तो शांत कसा बसेल?
इतिहासकार सावरकर:
केवळ भारतीयांच्या स्वभिमानासाठीच नाही तर ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने देखील या विधानांचा प्रतिकार करणे त्यांना आवश्यक वाटू लागले. आणि त्यांनी अभ्यासपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास लिहायचे ठरवले.
परंतू, भारताचा इतिहास लिहिणं म्हणजे सोप्पं काम नव्हतं. मुळात, भारत, चीन, ग्रीस, इजिप्शियन ही काही राष्ट्रे इतकी प्राचीन आहेत की त्यांच्या राष्ट्रीय जीवनाचा आरंभच पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीचा आहे.
त्यामुळे एवढा लांबलचक आणि अवाढव्य इतिहास लिहायला घेतला असता तर तो कदाचित रटाळ झाला असता आणि त्यांच्या उतार वयाचा विचार करता तो पूर्ण झाला असता का याची शंका होती. म्हणून त्यांनी आधी कालखंड निश्चिती करायचे ठरवले.
आपले प्रचंड पुरण वाङ्मय हे देखील आपल्या साहित्याचे, ज्ञानाचे, कर्तुत्वाचे एक भव्य भांडार आहे. परंतु पुराण म्हणजे इतिहास नव्हे. मग इतिहास कशाला म्हणायचं?
तर इतिहासाचं मुख्य लक्षण म्हणजे अवांतर पुरावे. पूर्वीची घटना, त्यातील स्थळ व काळ निश्चितपणे सांगता यायला हवे. त्या घटनांना स्वकीय व त्याचबरोबर परकीय पुराव्यांचे पाठबळ हवे.
आणि त्या कसोटीनुसार, आपल्या प्राचीन काळाचा वृतांत बुद्ध काळापासून मोजता येतो. किंवा बुद्ध काळ हा आपल्या इतिहासाचा आरंभ समजायला हवा.
त्यामुळे तिथपासून ते आताच्या ब्रीटीशांकडून मिळालेल्या स्वातंत्र्या पर्यंतचा कालखंड व इतिहासाचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. यावरून तुम्हांला कल्पना येईल, की त्यांच्या उतारवयात देखील त्यांनी किती कष्टाने या पुस्तकाचे लिखाण केले असावे.
बरं, कालखंड निश्चिती झाली, मग सोनेरी पानं कोणती?
आपला देश काही अमेरिका किंवा युरोपीय देशांसारखा नवा नाही. त्यांचा तर जन्मच मुळी काल-परवा सारखा. आणि त्यांचा इतिहास देखील टीचभर. काही प्राचीन राष्ट्रे तर आता नामशेष देखील झाली आहेत.
भारताचा इतिहास हा अगदी प्राचीनतम काळापासून आजपर्यंत अखंडपणे चालत आला आहे. चीन सारखी काही प्राचीन राष्ट्रे आपल्या महानतेचे पुरातन साक्षी म्हणून उरले आहेत.
आपल्या ऐतिहासिक काळात, काव्य, संगीत, शौर्य, आयुर्वेद, अध्यात्म अशा अनेक कसोटीवर उतरणारी कितीतरी गौरवशाली पाने सापडतील.
पण सावरकर लिहितात, की
प्रत्येक बलाढ्य व प्राचीन राष्ट्रावर पारतंत्र्याचे संकट केव्हातरी कोसळलेलेच असते.
अशावेळी, आक्रमक शत्रूच्या प्रबळ टाचेखाली ते राष्ट्र जेव्हा पिचून जाते, तेव्हा त्या शत्रूचा पाडाव करून व पराक्रमाची पराकाष्ठा करून, त्या पारतंत्र्यातून मुक्त करणारी व स्वातंत्र्याचे पुनरुज्जीवन करणारी एक झुंजार पिढी, तिच्यातील धुरंधर वीर व विजयी पुरुष व त्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या वृतांताचं आणि विजयाचं जे पान असतं, ते खऱ्या अर्थी इतिहासातील ‘सोनेरी पान’ असतं.
त्यामुळे, ज्या ज्या परकीयांनी हिंदुस्थानवर स्वाऱ्या केल्या(अलेक्झांडर किंवा तैमूरलंग ते ब्रिटीश ) व ज्या ज्या वीरांनी त्या परकीयांचा अंती धुव्वा उडवून हिंदुराष्ट्रास विमुक्त केले, त्या त्या स्वातंत्र्य संग्रामातील युगप्रवर्तक वीरांचे ऐतिहासिक शब्दचित्रण ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात केले आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशात काही जण माफीवीर म्हणून हिणवतात, कुणी त्यांच्या नावापुढे वीर लावणं हे देखील अयोग्य आहे अशी माहिती पसरवतात, हे केवढे दुर्दैव आहे. केवळ मार्सिलीस बंदराजवळ समुद्रात मारलेली उडी एवढेच काय ते सावरकर, असे अजूनही किती तरी जणांना वाटते. आणि त्यामुळे त्यांचे असे कितीतरी पैलू अनेकांना अज्ञात आहेत.
इतिहास लेखनात नवीन मापदंड रचणारे रियासतकार सरदेसाई एकदा सावरकरांना म्हणाले होते की, “सावरकर आम्ही फक्त इतिहास लिहिला, पण तुम्ही तो घडवला.”
या एका वाक्यात, सावरकरांचे इतिहासकार म्हणून महत्व अधोरेखित करण्यास पुरेसं आहे.
नेमक्या शब्दांत अभ्यासपूर्ण लेखन 🙏🏻
Thanks
Punha ekada khup chan lihiley
Very Nicely Done
Thanks 🙂
👌👌👌
🙏
Nice article dear…
Thanks 🙂
Very Nice Article 👌🏻👏🏻👍🏻
Thanks 🙂