व्यासांनी महाभारतात अनेक उत्तमोत्तम पात्र रचली. प्रत्येकाचा त्या नाट्यातील भाग कमी अधिक प्रमाणात महत्वाचा ठेवला.
व्यासांच्या महाप्रतिभेचा महाअविष्कार समजलं जाणारं हे महानाट्य …
त्यातील माणसं त्यांनी अशी काही उभी केली, कि केवळ एका दृष्टीत किंवा एका वाचनात देखील ती खोलवर समजत नाहीत.
ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात, प्रत्येक वेळी नव्याने कळू लागतात आणि तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समजू लागतात.
काही पात्र अतिरंजित तर काही फारच उपेक्षित.
काही पात्र मात्र अशी कि ज्यांच्या वाट्याला लौकिकार्थाने अत्यंत प्रतिष्ठेची भूमिका आली परंतू मुख्य भूमिका मात्र एका उपेक्षिता प्रमाणे.
देवकी !
म्हटलं तर फार महत्वाची भूमिका.
परमेश्वराला जन्म देण्याचं भाग्य ! प्रत्यक्ष तेजाचा गर्भात वास! महाग्रंथाचे सर्वार्थाने नायकत्व ज्याला समर्पित … असा महानायक, श्रीकृष्ण! त्याची आई होण्याचे परमभाग्य , कुणाही स्त्री ला हेवा वाटावे असे दुर्लभ मातृत्वाचे दान नियतीने केवळ तिच्या पदरी दिले …
पण या भाग्यास कुणाची दृष्ट लागावी?
आई तर व्हायचं मात्र नशिबात आईपणच नाही! भाग्य कि दुर्भाग्य ?
छे ! हे कसलं भाग्य? हे तर दुर्भाग्यच !
कारण एवढी भाग्यवान होती तर मग आधीच्या मुलांचा डोळ्यादेखत करुण अंत का बघावा लागला?
आणि हो ! त्या सर्व यातना सहन करून त्या परेमश्वराला जन्म दिल्यावर पुढचं आयुष्य काय?
तर त्याच तुरुंगात वर्ष वर्ष अश्रू गाळत बसायचं…. ?
जगण्यासाठी फक्त एकच समाधान कि मूल कुठेतरी सुरक्षित जगतंय
आणि एकच आशा कि कधीतरी येऊन तो आपली सुटका करेल….
अशा भाग्याला आणि या जीवनाला अर्थ तरी काय ?
कधी तिला वाटायचं, माझ्या बाळाचा नीट सांभाळ होत असेल ना?
माझ्या सारखं प्रेम त्याला कोण देणार?
पण त्याचसोबत मनात शंका देखील यायची…
त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी आई असेल तर त्याला माझ्याबद्दल कधी प्रेम वाटेल का?
कधी कळेल त्याला कि मी त्याची आई आहे म्हणून? त्या आईच्या ओढीमुळे तो माझ्या जवळ कधी आलाच नाही तर?
अनेक शंकांचं काहूर मोजायचं… अश्रू वाहत राहायचे….
अखेर एक दिवस नियतीने त्या महानाट्यातील तिच्या पात्राच्या करुण प्रसंगाला कायमचा पूर्णविराम दिला.
आणि सारं काही सुरळीत सुरु झालं…
आनंदीआनंद…. ज्या सुखाला ती अनेक वर्ष वंचित होती ते सुख आज तिच्या पायाशी होत.
पण तरीही…. तरीही तिचं मन अशांत होतं. अजूनही.
अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली होती.
आणि त्या साऱ्यांची उत्तरे तिला एका व्यक्तीकडून हवी होती.
यशोदा !
आईचं स्थान सर्वश्रेष्ठ असत.. मग, मला श्रीकृष्णाची आई म्हणूनच घेण्याचं श्रेय आयुष्यात एवढ्या उशिरा का मिळावं?
कारण इतके दिवस यशोदेने ती जागा चालवली … पण माझ्या वाट्याचे मातृसुख उपभोगायचा अधिकार नियतीनं तिला का दिला असावा ?
असा आक्रोश तिच्या मनात सुरु होता, तो शांत करायला ती यशोदेकडे आली .
यशोदेने देवकीला बघताच अतिशय आनंदाने तिचं स्वागत केलं.
ताई ताई म्हणत तिला इकडे बसवू कि तिकडे असं तिला झालं होतं.
यशोदेच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागली होती परंतु एक अनामिक तेज देखील होतं. .
कृष्णाला लहानपणी मी वाढवलं असतं तर आज मी पण अशीच दिसत असती का? देवकीच्या मनात विचार आला.
ऐन तारुण्यात रडून रडून खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा अश्रू दाटून आले.
स्वतःला सावरत तिने यशोदेला प्रश्न केला, “कृष्ण लहानपणी कसा दिसायचा गं? काय आवडायचं त्याला? कोणत्या रंगाचे कपडे त्याला आवडायचे ?”
अनेक वर्ष मनात दबलेल्या प्रश्नांना आज देवकीने मोकळी वाट करून दिली होती..
कृष्णाचं बालपण ! यशोदेचा चेहरा त्या रम्य आठवणींनी खुलला. त्याच्या बालपणीच्या इतक्या आठवणी होत्या तिच्याकडे की ती अथक त्या सर्व कथन करू लागली.
“त्याच्या बाललीला तुला काय सांगू ताई! इतका गोंडस, एवढा नटखट… कि सतत बघितलं तरी मनाची तृप्ती व्हायची नाही आणि केवळ माझाच नाही, पूर्ण गोकुळात तो सगळ्यांचा अगदी लाडका होता. “
देवकीच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधान दिसू लागलं.
आपल्या मुलावर एवढं प्रेम करणारं कुणी आहे हे ऐकून कोणती आई खुश होणार नाही?
यशोदा बोलत होती, “मी कृष्णाला आंघोळ घालून बाहेर आणलं कि प्रत्येक दासी त्याला तयार करायला , त्याला फिरायला घेऊन जायला अगदी तयारीनिशी उभ्या असायच्या. माझ्याकडे हट्ट करायच्या, “किती वेळ लावता अंघोळ घालायला, आमच्या कान्हाला आता आमच्या कडे सोपवा”.”
यशोदा पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवत होती. आणि देवकी, ती रेखाटत असलेल्या चित्रात तिच्या बाळाला मन भरून बघत होती.
“जसजसा तो मोठा होऊ लागला, त्याच्या खोड्या देखील तितक्याच वाढू लागल्या. माझ्या कडे अनेक जणी तक्रार घेऊन यायच्या… मी डोळे मोठे करून त्याला ओरडायची… कधी मारायला धावायची..
पण तो इतका लबाड… कि तेव्हाही काहीतरी खट्याळ बोलायचा… आणि आपसूक माझ्या तोंडून हसूच निघायचं.”
देवकीला वाटलं … त्याला घट्ट बिलगून जवळ घ्यावं.
“पण मी ठाम राहून त्याला चांगलं सुनवायचे. तर तक्रार घेऊन आलेल्या गोपिका माझ्यावरच उलटायच्या. आम्ही काही त्याला तुम्ही ओरडावं किंवा मारावं म्हणून थोडीच सांगायला आलोय… अस्सं वेड लावलेलं याने सगळ्यांना कि काय सांगू?”
देवकी एकटक यशोदेकडे बघत होती. तिच्या शंका हळूहळू मिटू लागल्या होत्या.
यशोदा पुढे म्हणाली,, “असं वाटायचं… कि त्यांना सांगावं . हे सगळं ठरवायचा हक्क केवळ माझा आहे, मी त्याला ओरडेन मरेन किंवा त्याचे लाड करेन. तुम्ही नका मला हे सांगू.
पण, मला एक कळत होतं कि तो माझ्या एकटीचा नव्हताच. “
देवकीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती.
“कृष्ण राधेच्या प्रेमात पडला तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवलं. राधा येऊन त्याची तक्रार करायची. “हा सगळ्या गोपिकांना छेडत बसतो… मला वेळ देत नाही “ असं राधेने म्हटल्यावर वाटायचं… माझा नाही तर निदान राधेचा तरी व्हावा… . पण जेव्हा गोकुळ सोडून गेला… मला सोडून गेला…. आणि राधेला सुद्धा… तेव्हा जाणवलं… कि त्याच्यावर केवळ आमचाच हक्क आहे असं नव्हतं. कधीच नव्हतं.
त्याला अजून कितीतरी उंच जायचं आहे… आमच्या मोहाच्या बेड्यात अडकणाऱ्यातला तो नाहीच…. “
देवकीच्या मनातलं मळभ दूर होत आलं होतं.
तरी एक शेवटचं म्हणून तिने प्रश्न केला, “पण कधी आई निवडायचा प्रश्न आला, तर तो कुणाला निवडेल गं? तुला कि मला?”
यशोदा या प्रश्नाने गंभीर झाली.
दोघींच्याही मनात कालवाकालव सुरु झाली.
देवकीच्या मनात विचार आला…. मी जन्म दिला आहे… सर्वप्रथम हक्क तर माझाच….
त्याच वेळी यशोदा विचार करू लागली, कृष्णाने माझ्या पोटी जन्म नसेल घेतला, पण ‘आई’ हि हाक तर त्यानेच मलाच सगळ्यात पहिले दिली ना?
एकामागोमाग एक विचारांचे थवेच्या थवे दोघींच्या मनाच्या आकाशात घेर घेऊ लागले.
खरंच ! कृष्ण कुणाचा? कसं सांगता येईल ?
तेवढ्यात कृष्णाने त्या दालनात प्रवेश केला. त्याला असं अकस्मात तिथे बघून दोघी अचंबित झाल्या.
दोघींनाही त्याच्या येण्याने अतिशय आनंद झाला होता
कृष्णाने आल्यावर दोघीना वाकून नमस्कार केला.
दोघीही भरभरून आशीर्वाद देत अगदी आशाळभूत नजरेने त्याच्याकडे बघत होत्या.
कृष्णाने सारे काही ओळखले होते.
गालातल्या गालात तो हसत होता. आणि मग मनाशी काहीतरी ठरवून त्याने यशोदेला म्हटले,”आई, खूप भूक लागलीये … काहीतरी छान घेऊन ये तुझ्या हातचं आणि लोणी सुद्धा आण थोडं “
यशोदा हर्षोल्लीत होऊन उभी राहिली आणि धावत स्वयंपाक घरात निघून गेली.
देवकी मात्र या प्रसंगामुळे काहीशी उदास झाली.
आई बनून सुद्धा मी कधी माझ्या मुलाला खाऊ घालू शकले नाही याचं तिला फार वाईट वाटू लागलं. त्याला काय आवडतं काय नाही हे देखील आपल्याला माहित नसावं याची तिला खंत वाटू लागली स्वयंपाकघरात जाऊन यशोदेला मदत करावी म्हटलं तरी एक पराभवाची भावना तिला अस्वस्थ करत होती.
देवकी खाल मानेने बसली होती. स्वतःला दोष देत.
मी जन्माची अभागी…. यशोदेशीं तुलना कशी करू शकते?
तिने आपल्या मुलाचा एवढ्या प्रेमाने सांभाळ केला आणि मी ? तिच्या प्रेमाशी तुलना ?
काही वेळातच यशोदा एका थाळीत कृष्णाला आवडतं ते सारं काही घेऊन आली.
“बघ रे, मऊ मऊ लोण्याचा गोळा देखील आणलाय तुझ्यासाठी “
कृष्णाने ते ताट हातात घेतलं आणि तो देवकीजवळ गेला.
देवकी भानावर आली.
ताट तिच्यासमोर धरून मंद स्मित करत तो म्हणाला, “आई खूप भूक लागली आहे गं … मला भरवशील ? “
देवकीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
तिच्या मनातल्या साऱ्या शंका, सारे प्रश्न त्या जलधारांत वाहून गेले.
कृष्ण अजूनही गालात हसतच होता.
काहीही न बोलता लीला करणं फक्त तोच जाणो !
अश्रू भरल्या डोळ्यांनी देवकी त्याला एक एक घास भरवत राहिली.
कधी पदराने त्याचा घाम पुसत, कधी ठसका लागला तर त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली . यशोदा अजूनही त्याच्या बालपणीचे किस्से सांगत तिचं आईपण पुन्हा एकदा जगत होती.
कृष्ण लीला हेच सांगून जाते कि कृष्ण कुण्या एका व्यक्तीचा नाहीच…
कृष्ण देवकीचा तसा तो वसुदेवाचा सुद्धा…
तो यशोदेचा आणि नंदाचा सुद्धा..
तो राधेचा …मीरेचा… अनंत गोपिकांचा…
अर्जुनाचा आणि कर्णाचा सुद्धा…
जसा त्यांचा तसा आपला सुद्धा..
तो जसा तुझा तसा माझाही… जसा त्याचा तसा तिचाही… तो सगळ्यांचा.
कृष्ण कुण्या एकट्याचा नाहीच . तो सगळ्यांचाच !
जय श्री कृष्ण !
खूप छान. नेहमी प्रमाणे.
खूपच छान 👌🏻👌🏻
सुंदर….
धन्यवाद 😊
किमया, छान लिहिलंयस !!! कृष्ण कृष्ण !!
खूप खूप धन्यवाद🙂