आपण सारे भारतीय किती भाग्यवंत आहोत की ज्या भूमीत त्रिखंडात कीर्ती असणारं राम राज्य होऊन गेलं, त्या भूमीला आपण आपली मायभूमी म्हणतो. आणि ज्या भूमीवर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने पाऊल ठेवले, ज्या भूमीवर त्याचा वावर झाला, त्या या भारतभूमीला मातृस्थानी मानण्याचा अभिमानास्पद अधिकार आणि ते सौभाग्य विश्वनिर्मात्याने केवळ आपल्याला दिले आहे.
कारण, अधर्माचा विनाश करणारा आणि ‘संभवामि युगे युगे’ असं म्हणत संत-सज्जनांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या भगवान विष्णूने रावणाच्या संहारासाठी अवतार घेऊन मनुष्य रुपात जन्म तर घेतला. परंतू, गंमत पहा, रावण तर लंकेचा राजा होता. मग रामाचा जन्म लंकेत का बरं झाला नसावा?
आपले अवतार कार्य संपन्न करण्यासाठी देखील भगवान विष्णूने भारतभूमीलाच पसंती दिली, नाही का?
असो, राम नवमी निमित्त सर्व भाविकांना भरभरून शुभेच्छा.
आजची पोस्ट या साठी की, अनेक युगांपूर्वी आजच्या या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. त्या निमित्ताने त्याच्या चरित्रातील काही निवडक प्रसंग मला फार दिशादर्शक वाटतात, त्याची तुमच्याशी चर्चा करावी.
श्रीरामाचा संपूर्ण जीवनपट आपण डोळ्यासमोर आणला तर एक गोष्ट लक्षात येते की तो देव असूनही मनुष्य जन्म घेतल्यावर त्यालाही अनेकदा दुःखं, संकटाना सामोरे जावे लागले. परंतू त्याने अपार संयम दाखवला..
आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श पती,आदर्श राजा अशा अनेक भूमिका साकारतांना प्रत्येकवेळी संयमी व संवेदनशील वृत्तीने वागतांना त्याच्या मनाला केवढ्या यातना झाल्या असतील? आणि तरीही त्याने कायम कर्तव्य पालन करण्यास प्राधान्य दिले.
रामायणातील अनेक प्रसंग, काही व्यक्तिरेखा यांना बारकाईने बघितलं तर जीवनातील अनेक समस्यांची उत्तरे मिळतात.
भावाचे, नवऱ्याचे, बायकोचे, सेवकाचे कर्तव्य काय असावे, कसे वागावे अशा कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.
अगदी उद्या आपण राजा बनणार आहोत, नगरात आनंदी आनंद आहे, सगळीकडे राज्याभिषेकाची तयारी सुरु आहे, पत्नी सीता देखील आता अयोध्येची राणी होणार या भावनेने खुशीत आहे, पण प्रत्यक्ष वडील मात्र चिंतेत आहेत.
कुठल्या तोंडाने राजवैभवात वाढलेल्या आणि नुकताच विवाह झालेल्या आपल्या तरुण मुलाला १४ वर्षे वनवासात जाण्याची शिक्षा सांगू या विचाराने त्यांचे ओठ शिवले आहेत. अशा वेळी रामानेच वडिलांना सर्वकाही निःसंकोच पणे सांगण्यास सांगितले.
आणि ते कळताच अगदी क्षणाचाही विलंब न करता केवळ वडिलांची वचनपूर्ती व्हावी आणि आई कैकेयी चा देखील वचन मागण्याचा अधिकार पूर्ण व्हावा, तिच्याही मनीषेचा मान रहावा या साठी हसत हसत वनवासात जाण्यास तयार झाला.
बरं, १४ वर्षे वनवासात जाण्यासाठी दिलेल्या होकारात कोणताही राग, सावत्र आईविषयी द्वेष, हाती तोंडी आलेलं राज्य गेल्याचं नैराश्य, नववधू सीतेपासून लांब होणार याचे दुःखं नव्हते.
होता तो केवळ निर्मळ आनंद, वडिलांचे वचन पूर्ण केल्याचा. गुरुजनांकडून मिळालेले हेच शिक्षण, आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो आहोत, याचे समाधान.
यातून, आई-वडिलांचे आपल्या आयुष्यातील स्थान काय असावे हे राम सहज शिकवून जातो.
रामाचे व सीतेचे वनवासात जायचे निश्चित झाल्यावर जेव्हा लक्ष्मणाला ही गोष्ट कळली तेव्हा चवताळून त्याने शस्त्र घेऊन रामाकडे धाव घेतली आणि “दादा, कोण तुला राजा बनण्यापासून अडवत आहे ते सांग, अगदी स्वर्गातला इंद्र असला तरी त्याला ठार मारीन”, हे उद्गार त्याच्या मुखातून आपसूकच निघाले.
यातून एक गोष्ट लक्षात येते की, रामा एवढेच अफाट सामर्थ्य लक्ष्मणात देखील आहे. परंतू, राम वनवासात चाललाय तर ठीकच, भरताचा वध करून आपणच अयोध्येचा राजा बनून राज्य करू अशी पुसटशी इच्छा देखील त्याच्या मनाला शिवली नाही.
जे काही सामर्थ्य आहे, ते केवळ माझ्या मोठ्या भावाला सिंहासनी बसवून त्याची सेवा करावी आणि त्याचे रक्षण करावे यासाठीच. आणि त्याच भावनेने अगदी हट्ट करूनच लक्ष्मण रामासोबत वनवासात गेला. नववधू उर्मिलेला देखील त्याने आपल्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ हे प्रथम कर्तव्य आहे हे समजावून सांगितले, तिला सोबत नेले नाही.
मला वाटतं, कर्तव्याची कधी काही व्याख्या करायची असेल तर लक्ष्मण आणि उर्मिला यांची नावे यायला हवीत. कारण विवाह होताच सलग १४ वर्षांचा विरह तोही केवळ कर्तव्यपूर्ती साठी करणारे हे दांपत्य खरोखर जगावेगळे आहे.
दुसरं असं की , भरत देखील काही कमी नव्हता. रामदादा ज्या सिंहासनावर बसणार नाही त्यावर त्याचा धाकटा भाऊ मी कसा बसणार? या विचाराने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्षं राज्य केलं पठ्ठ्याने… दोन्ही भाऊ आणि वहिनी जंगलात रहात असतांना मी महालात कसं राहायचं? म्हणून स्वतःवेगळी झोपडी बांधून तितकी वर्षं त्याने काढली.
म्हणजे या सर्व भावांना कुणी सावत्र भाऊ कसं म्हणू शकेल? सख्ख्या भावांमध्ये देखील बघायला मिळत नाही एवढं निःस्वार्थी प्रेम या भावांमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे बंधुभाव काय असावा हे रामायण शिकवते, ते अशा प्रसंगातूनच.
बरं, सीतेच्या अपहरणाच्या प्रसंगाचा नीट अभ्यास केला तर मला अगदी लक्ष्मणाच्या पायावर लोटांगण घालावंसं वाटतं, अशी त्याची वर्तणूक आहे. संयम आणि कर्तव्यपूर्ती केवळ श्रीरामात नाही तर लक्ष्मणात देखील ओतप्रोत भरली आहे हे यावरून लक्षात येते.
म्हणजे राम निघून गेल्यावर कुटीमध्ये केवळ सीता आहे, आणि लक्ष्मण अस्वस्थतेने येरझारा मारत आहे. तिकडे कपटाने मारीच राक्षस मरतांना रामाचा आवाज काढतोय. आणि ते ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जा म्हणून हट्ट करतेय. प्रसंगच मुळी लक्ष्मणाची परीक्षा बघणारा होता.
हे काहीतरी मायावी कारस्थान आहे हे लक्ष्मणाने पुरते ओळखले आहे, आणि रामाच्या सामर्थ्यावर देखील त्याचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्या भयाण जंगलात सीता वहिनीचे रक्षण करणे जास्त महत्वाचे आहे आणि तसे आपण भावाला वचन देखील दिले आहे. ते प्रथम कर्तव्य समजून त्याने जाण्यास नकार दिलेला आहे.
परंतू, लक्ष्मण माझ्या आज्ञेचे पालन करीत नाही आणि पती राम देखील संकटात आहेत, अशा वेळी मनी नाही नाही ते विचार येतात, तसे सीतेलाही आले. आणि तिने लक्ष्मणाच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आता, जिला आईस्थानी मानतो तिनेच असे बोलल्यावर काय आघात झाला असेल लक्ष्मणाच्या मनावर?
एकीकडे रामाने अडवून ठेवले आहे सीतेच्या रक्षणाच्या वचनात आणि दुसरीकडे सीता सांगत आहे रामाच्या मदतीला जा. केवढे वैचारिक युध्द झाले असेल त्याक्षणी लक्ष्मणाच्या मनात?
आणि मग त्याने जो उपाय केला तो आजही आपल्या आयुष्यात अंगीकारण्यास पात्र आहे. लक्ष्मण रेषा.
सीतेचा लहान दीर असला तरी कर्तव्यनिष्ठ सेवक या नात्याने लक्ष्मणाने आखून दिलेली मर्यादा रेषा. आपल्याही कृतीत, आचारात, विचारांत, पेहरावात, जीवनाच्या अनेक गोष्टीत लक्ष्मण रेषा असतात. आपण त्या ओळखून त्या मर्यादेत राहिलं तर पलीकडे उभा असलेला संकटरुपी रावण कधीच आपल्याला स्पर्शू शकणार नाही, हे शिकवते रामायण.
पुढे रावणाने पळवून नेतांना खुण म्हणून सीतेने टाकलेले दागिने जेव्हा मिळाले, तेव्हा देखील ओळख पटावी म्हणून लक्ष्मणाला दिले असता, आदर्श दीर कसा असावा हे पुन्हा एकदा लक्ष्मणाने दाखवून दिले. सीतेच्या अंगावर कोणते दागिने असायचे हे तो ओळखू शकत नाही केवळ पायातील पैजण ओळखू शकतो, याचे कारण, मोठी वहिनी ही मातेसमान असल्याने लक्ष्मणाची नजर कायम तिच्या पायाकडे असायची.
ह्या वर्तनामुळे लक्ष्मण खरोखर मनांत घर करून राहतो.
रामातील आदर्श आणि संयमी राजा पुढे राम-रावण युद्धात दिसून येतो. मुळात रावण वृद्ध झालेला आहे. आणि आता युद्ध करतांना तो थकला देखील आहे. अशावेळी अगदी सहज एका बाणात त्याला ठार करता येणे शक्य असतांना देखील रावणाला राजा असल्याने राजा सारखे युद्ध करतच मरण यावे असे म्हणत त्याने त्या वेळी देखील रावणाला युद्धाची संधी दिली.
रावणाच्या मृत्यू नंतर बिभीषणाने आपल्या नीच भावाची म्हणजे रावणाची उत्तर क्रिया कर्म करण्यास नकार दिला. तेव्हा देखील प्रभू श्रीरामाने मृत्युनंतर वैर संपतं असे सांगून रावणाचे अंतिम कार्य करण्यास बिभीषणास समजावले, आणि ‘तू करणार नसशील तर मोठ्या भावासमान रावणाची उत्तरक्रिया मी स्वतः करेन’ असे देखील सांगितले.
पुढे, रावणाचा मृत्यू झाला आहे, लंका देखील समृद्ध अशी नगरी आहे. असे असतांना, भरत अयोध्येत राज्य करत आहे तर आपण इथेच लंकेतच आपले भव्य राज्य उभे करू अशी एक कल्पना लक्ष्मणाने सुचवली असता रामाने म्हटले,
”अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते | जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”
ही सुवर्णाने भरलेली लंका कितीही समृद्ध असली तरी आई आणि मातृभूमी स्वर्गाहून मोठ्या आहेत.
म्हणजे पहा नं, प्रत्येक प्रसंगात रामाने आदर्श वागणुकीचे उदाहरणच जगाच्या समोर ठेवले आहे.
आपल्या अशा ग्रंथातूनच संस्कृतीचा वारसा पुढे जातो आहे.
राम राज्य हे आदर्श राज्य होतं कारण, रामाच्या प्रत्येक कृतीमागे आदर्श विचार होता. आदर्श राजा होण्या मागे रामाचा बराच स्वार्थ त्याग होता, सीतेला वनवासात पाठवताना देखील झालेली घालमेल होती, परंतू राजाने कसे वागले पाहिजे तसे तो वागत राहिला. राम राज्य हे सुराज्य असण्या मागे रामाचे अनेक निष्ठावंत सेवक देखील होते. आणि ते निष्ठावंत असण्याचे कारण त्यांचा राजा देखील तितकाच कर्तव्यनिष्ठ होता.
अशा प्रभू श्रीरामाचे त्याच्या जन्मस्थानी, अयोध्येत आता मंदिर बनत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या भारतभूमीत राम राज्य स्थापन होवो ही श्रीराम चरणी प्रार्थना करूया.
|| जय श्रीराम ||
खूप छान!
धन्यवाद🙂
खूप छान राम व्यक्त केलाय तुम्ही.
थँक्स🙂
छान आहे, सध्या लागतील त्या गोष्टी निवडून मांडल्या आहेस, जय श्रीराम
जय श्रीराम🙏
Khup chan. Jai Shri Ram
कलीयुगाच्या मोहमायेत अडकलेल्या या मनुष्य प्राण्याला
त्रेतायुगातील हे विचार व जीवनशैली निश्चित प्रेरणादायी आहेत
धन्यवाद काका🙏
क्या बात है..एकदम मस्त नेहमीप्रमणेच
Thanks🙏🙂
Jai sri ram
Explained very well🙏🙏
Thanks 🙏🙂
छान लिहीलस, मूद्देसूद…..👌👍
धन्यवाद🙂