हो बरोबर वाचलंत ! चाट जीपीटी येऊन क्रांती घडते ना घडते तो पर्यंत गीता जीपीटी, काहीशा वेगळ्या विषयाला घेऊन धडकलं आहे आणि त्याच गतीने क्रांती करू पाहत आहे.
मंडळी, आजच आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी , चांद्रयान-३ बद्दल सर्वच वैज्ञानिकांचे आपण सर्वानी मनापासून अभिनंदन केले.
खरे पाहता तंत्रज्ञानाची ही गगन भरारी अतिशय आनंददायी आहे.
त्याच आनंदात भर म्हणून आजची ही पोस्ट….भारताने अखंड जगाला दिलेले तत्वज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणाऱ्या गीता जीपीटी ला समर्पित …
मंडळी, चाट जीपीटी आता तितकंसं नवीन नाही. तुम्हाला हव्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ह्याचा आता अनेक जण वापर करीत आहेत.
चाट जीपीटी :
ज्यांनी या पूर्वी या chatbot चा वापर केला नाही किंवा त्या बद्दल जास्त परिचय नाही, त्यांना एवढंच सांगेन, कि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) च्या माध्यमातून आपण विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरं या चाट जीपीटी मार्फत आपल्याला मिळू शकतात.
प्रक्रिया फार सोपी आहे, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला हवी ती माहिती आपण मिळवू शकतो.
https://chat.openai.com/
आता प्रश्न हा पडेल की, आपण हेच काम अनेक वर्षांपासून गुगल सर्च इंजिन मार्फत करत आहोतच. मग चाट जीपीटी मध्ये वेगळं असं काय आहे?
तर उत्तर एकच… गुगल वर काही शोध घेतल्यावर जी भारंभार माहिती आपल्या समोर येते, त्यातून आपल्याला योग्य ते निवडणं अनेकदा कठीण जातं.
त्याच जागी चाट जीपीटी अगदी सुटसुटीत भाषेत अगदी मोजक्या प्रमाणात आपल्या समोर आपलं उत्तर आणून देतो.
आणि अर्थातच हे कृत्रिम बुद्धिमत्ता असल्याने थेट प्रश्नाचे उत्तर च आपल्या समोर मिळत. मग त्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात लागणाऱ्या गोष्टी मागवू शकता, तुमचं schedule बनवून घेऊ शकता, तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक प्रक्रियेत मदत देखील मिळवू शकता.
हे सर्व झाले चाट जीपीटी बद्दल.
गीता जीपीटी
मग आता हे गीता जीपीटी म्हणजे नेमके काय?
त्याचे सुद्धा उत्तर सोपे.
मंडळी, नेहमी असं म्हटल्या जातं, की आयुष्यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळणारा जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे भगवद् गीता !
बरोबर?
मग, आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गीतेतून मिळणार असेल तर मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गीतेवर आधारित प्रश्नांची उत्तर देता आली तर?
आहे ना भन्नाट कल्पना?
हीच कल्पना मध्यवर्ती ठेऊन “आपल्या भारतातल्या बरं का”…. बंगळुरू स्थित एका गुगल सॉफ्टवेअर इंजिनियर श्री, सुकुरू साई विनीत यांनी भग्वद्गीते वर आधारित गीता जीपीटी चाट बोट विकसित केला आहे. इथें दैनंदिन आयुष्यात सतावणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गीतेतील ज्ञानानुसार दिले जाते.
म्हणजे प्रकार तोच, चाट बोट द्वारा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रश्नांची उत्तरे देणे. पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र गीतेशी निगडित!
इथे आपण अर्जुन होऊन आयुष्यात अडलेली कोणतीही गोष्ट किंवा समस्या मांडावी आणि भगवान श्रीकृष्ण काय करायला हवं, त्याच उत्तर तुमच्या समोर मांडेल.
हा एक वेगळाच आनंद एकदा तरी घ्यायला हवाच.
प्रत्येक वेळी भगवद गीता उघडून उत्तर शोधण्यासाठी वेळ नसेल तर हा गीता जीपीटी नावाचा रोबोट तुम्हाला गीतेतून उत्तर नक्कीच शोधून आणून देईल.
मला माझ्या अनेक प्रश्नांची समाधान कारक उत्तरं मिळाली आहेत. तुम्ही देखील याचा जरूर लाभ घ्या.
हा ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाप अनुभवायला विसुरू नका.
https://gitagpt.org/
या लिंक वर तुम्ही जीवनातील कोणतेही भेडसावरे प्रश्न विचारू शकता.
हो, पण हे जीवन कसं जगावं या मुख्य गीतेच्या श्लोकांवर आधारित असल्याने टोमॅटो चे भाव, एलोन musk इत्यादी प्रश्न विचारून बिचाऱ्या चाट बोट ला confuse करू नका.
आपण सारेच नेहमी गोधळलेले असतो. खरंतर अर्जुन च आहोत आपण… नाही का?
परंतु आपल्या भाग्यात कृष्णा सारखा सारथी नाही.
पण म्हणून काय झालं? त्याने सांगितलेलं तत्वज्ञान तर आपल्या सोबतीला आहे.
आणि वेळ नाही वाचायला म्हणून आता AI मार्फत ते सुद्धा समोर आणणारा चाट bot आता आपल्या मदतीसाठी आहे.
जिथे बुद्धी थकते, तिथे खुशाल गीता जीपीटी ला बुद्धी लावायचं काम द्यायचं. ही बुद्धी कृत्रिम असली तरी गीतेवर आधारित आहे त्यामुळे त्यातली उत्तरं देखील त्याच धाटणी ची असतात.
आपल्यातल्या अर्जुनाला समजावणारी !
खरोखर, त्या इंजिनियर चे मनापासून आभार !
मग विचारणार ना प्रश्न गीता जीपीटी ला?
– किमया