काही काही वेळा पुस्तकं एकाच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतात. अर्थातच त्या मागे त्या लेखकाचा त्या गोष्टीमागचा अभ्यास, संशोधन, त्याचे विचार, त्याने आत्मसात केल्यानंतर त्यातल्या प्रक्षिप्त गोष्टी या आल्याच.
पण त्यानिमित्ताने, विशेषकरून इतिहासाकडे निर्भेळ दृष्टीने बघायला आपण शिकायला हवं हे मला कालांतराने जाणवू लागलं.
आणि म्हणूनच, माझ्या मनात ठाम विचार असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही लेखन आढळल्यास मी ते आवर्जून वाचायला हळूहळू शिकले.
त्या अनुषंगानेच , मागील आठवड्यात वाचनालयातून एक आगळं वेगळं शीर्षक असलेलं, मूळ लेखन दिनकर जोशी यांचं अनुवादित ‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम‘ हे पुस्तक मी घेऊन आले.
रामायण या पूर्वी मी कधीही साहित्यिक रूपात वाचलंच नव्हतं. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत जे-जे दाखवलं तेच सत्य.. आणि तेच खरं रामायण हे पूर्वी मला वाटायचं, इतकं अफाट ते जमून आलं होत. अर्थात त्याकाळात मनोरंजनाचे इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसताना, ती मालिका लोकांनी डोक्यावर घेतली नसती तरच नवल. परंतु, हळूहळू वाल्मिकी रामायण, तुलसीदासांचं रामायण असे एक एक पैलू त्या प्रतिभाशाली अविष्काराचे मला समजू लागले.
त्याही पुढे अनेकदा लोकसाहित्यातून, तसंच मौखिक साहित्यातून रामायणात घडलेल्या विविध कथांचं वाचन , श्रवण केल्यावर नवनवीन प्रसंग डोळ्यासोर आले, जे रामायण या आपल्या मनात बसलेल्या संकल्पनेला हलवणारे नव्हते परंतु त्यापेक्षा वेगळ्या दिशेचे होते.
रामायण आणि महाभारत या महाग्रंथांची ही एक खासियत च म्हणायला हवी की प्रांतोप्रांती, लोकसाहित्यातून किंवा साहित्यकारांच्या कल्पनेतून त्यात प्रक्षिप्त लेखनास वाव आहे. तसे इतर कोणत्याही साहित्यात नाही. म्हणूनच मी देखील एका लेखात ‘ कृष्ण कुणाचा?‘ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकले.
आता आताच्या काळात देखील पौराणिक कथांचा अभ्यास करून तरुण पिढीसमोर पुन्हा नव्याने सादर करण्याकडे नवीन लेखकांचा कल दिसून आला.
सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक’ अशी आजवर सीतेची प्रतिमा भारतीय जनमानसात रुढ होती… आणि ती तशीच रूढ करण्यात परंपरावाद्यांचा एक मोठा डाव होता. कारण समाजात असे आदर्श उभे केले की मागाहून येणाऱ्या स्त्रियांना त्यांचा दाखला देणं सोपं जातं.
परंतु, अमिषने त्रिपाठी ने सीतेला वीरांगना दाखवून तिच्या आजवरच्या पारंपरिक प्रतिमेला छेद दिला. आपल्या नगरीचं मिथिलेचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणारी, तसंच रामाबरोबर अरण्यातही त्याच्या बरोबरीने उभी ठाकणारी सीता दाखवून त्याने तिचं क्षात्रतेज उजळून टाकलं. परंतु, आधी सांगितलं त्याप्रमाणे, तिची भोळी, सात्विक प्रतिमा मनावर एवढी बिंबवली गेली होती कि अमिषच्या पुस्तकातून समोर आलेली सीता मला(हे माझं वैयक्तिक मत) स्विकारताना काही प्रमाणात का होईना पण भावनिक चढाओढ झाली.
पण कालांतराने मी त्या हि सीतेचे मनोमन स्वागत केले. अमिषच्या लेखणीला मात्र सलाम….
त्याच बरोबर, भैरप्पांनी ‘उत्तरकांड’ लिहून सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक वेगळीच बाजू समाजासमोर आणली. रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. पण, सीता जशी रामापासून दूर होती, त्याप्रमाणेच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल अनेकदा केला जातो. नेमका असाच सवाल भैरप्पांच्या उत्तरकांडमधली सीता रामाला करते.
ती म्हणते- ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर होतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे.
मलाही नेहमी एक प्रश्न सतावत राहतो, रामाचे वडील दशरथ, यांचा ३ स्त्रियांशी विवाह झालेला आहे, राजरोसपणे या तीन स्त्रियांसोबत सुरु असलेला संसार बघतांना अयोध्येतील त्याच लोकांना कधी वावगं वाटलं नाही. परंतु सीतेच्या पावित्र्याबाबत मात्र त्यांना शंका यावी ?
आपण रामनाम जपतो, रामकथेचे सोहळे होतात, पण सीतेचे अग्निदिव्य आणि अखेरीस सीतात्याग या प्रसंगातील रामाच्या भूमिकेबद्दल नेहमी मौनच राखतो. नाही का?
राम म्हणू राम
नाही सीतेच्या तोलाचा
सीतामाई हिरकणी
राम हलक्या दिलाचा
अशी ओवी एकदा माझ्या वाचनात आली .
त्याच बरोबर, एका प्रवास वर्णनाच्या पुस्तकात असं वाचनात आलं की , उत्तर भारतात एके ठिकाणी केवळ सीतेचं मंदिर आहे, तिथे राम , लक्ष्मण हनुमान कोणीही नाही. म्हणजे आपल्याच देशात, विविध प्रांतातून रामायणाकडे बघण्याचं वैविध्य बघायला मिळत.
मग लक्षात आलं, मूळ रामायणात त्या ग्रंथाच्या मूळ रचनाकाराने निर्मिलेला कथाभाग किती आणि प्रक्षिप्त किती असा नीरक्षीर न्याय करणे खरंच फार अवघड आहे.
‘अयोध्येचा रावण, लंकेचा राम’ हे पुस्तक वाचताना, रामायण व त्यातील मुख्य प्रसंग तटस्थपणे लिहिले आहे हे जाणवते. अर्थात हे देखील कल्पक शब्दरूपच आहे परंतु, वर नमूद केल्याप्रमाणे विविध रामायणे, लोकगीते, श्रुतीकथा यातून मांडल्या गेलेल्या वेगवेगळ्या कल्पनांचे सार यात मांडण्याचा केलेला प्रयत्न वाचनीय आहे.
रावणाची देखील एक वेगळी बाजू या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळते. सीतेचे अपहरण करण्या मागचा त्याचा हेतू, त्या पूर्वी घडलेल्या घटना, स्वतःच्या उणिवा किंवा मर्यादा जाणून असणारा रावण, वेदवेदांगांचा व शास्त्रांचा प्रकांड ज्ञाता असणारा रावण असे त्याचे विविध पैलू आपल्याला वाचायला मिळतात.
त्याच बरोबर, रावण मृत्यूच्या दाराशी असताना, त्याच्याकडे असलेलं अगाध ज्ञान भांडार त्याच्यासोबत नाश पावू नये म्हणून त्याचे शिष्यत्व पत्करून ते ज्ञान त्याच्याकडून मिळव, अगदी थोडाच अवधी बाकी आहे, हे लक्ष्मणाला सांगणारा राम देखील वाचायला मिळतो.
शिवाजी सावंत यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रित्या लिहिलेली आणि मराठी साहित्यातील अजरामर कादंबरी ‘मृत्युंजय‘ वाचतांना काही प्रसं गी दुर्योधनाबद्दल देखील करुणा वाटते.
कर्ण कौरवांच्या बाजूने लढत असूनही शेवट पर्यंत मन त्याच्यासाठी व्याकुळ राहत. सारी कौरव सेना जावी पण कर्णाचा अंत होऊ नये … हे वाटत राहणं म्हणजे केवळ आपल्या मनाच्या संवेदनशील असल्याची ग्वाहीच नाही तर त्यात लेखकाच्या प्रतिभेची, सचोटीची आणि मानवी अंतरंगात उतरून त्याचा वेध घेण्याच्या क्षमतेची देखील आहे . साहित्यिक हात धरून आपल्याला नाण्याच्या अंधाऱ्या असल्या तरी दुसऱ्या बाजूकडे अलगद घेऊन जातात. ती बाजू आपल्याला आवडो अथवा न आवडो, जाणून घ्यायला हवी, स्वीकारायला हवी.
संपूर्ण पांढरं किंवा संपूर्ण काळं असं जगात काहीच नसतं. पांढरा भासणाऱ्यात थोडा काळा आणि काळा दिसणार्यात थोडा फार पांढरा रंग असतोच, हे लक्षात घ्यावं किंवा ते मान्य करून निर्मळ मनाने त्या कडे पहावं हा पुस्तकातील मांडणीच्या मागील हेतू आहे.
त्यामुळे, काही जणांना रामाबद्दल काही लिहिलेलं वाचून वाईट वाटेलही, त्यांच्या भावनाही दुखावू शकतील पण सर्व बाजू समजून घेण्याचं जाणतेपण अंगी बाळगूनच अशा कलाकृतींचा आस्वाद घेता येईल, हे ही तितकंच खरं.
पाण्याने भरलेल्या अनेक भांड्यांत सूर्याचं प्रतिबिंब दिसत असलं, तरी तत्वतः सूर्य एकच असतो. भगवान रामाचे देखील तसेच आहे. प्रत्येकाने आपापल्या ज्ञान व अनुभवाच्या नजरेतून रामास पाहीले व जाणले आहे. साहित्य निर्मिती देखील त्याच दृष्टीतून घडत गेली आहे. अर्थात तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच.
दिनकर जोशी यांनी ज्या नजरेतून रामाला पाहिलं, त्यांना जे दिसलं, जाणवलं, अनुभवलं त्याचं शाब्दिक चित्रण या पुस्तकात सादर केलं आहे. पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही .
ज्यांना वेगळ्या धाटणीत लिहिलेल्या पौराणिक कथा वाचायला आवडतात, त्यांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा.
Karan & Duryodhan have choice to choose, what the result they gate just because of their choice.